
परतीचा प्रवास – आणि आठवणींच्या सावल्या.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- गणपती बाप्पाला निरोप देण्याचा तो दिवस मनाला अक्षरशः ओलावून टाकणारा होता. सकाळपासूनच गावात उत्सवाचा गजर आणि हृदयात विरहाची कळ दाटून आली होती.
- प्रत्येक घरातून सजवलेली मूर्ती, फुलांची उधळण, आरतीचे सूर आणि “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणणाऱ्या डोळ्यांतील ओलसर प्रेम – जणू संपूर्ण गावाचा आत्मा त्या निरोपात सामावला होता.
- संध्याकाळी मिरवणुकीचा तो रंगीबेरंगी सोहळा समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचला तेव्हा निसर्गही भक्तीत सामील झाला होता.

- अस्ताला जाणाऱ्या सुर्याच्या सोनेरी किरणांत आरतीचे दीप उजळले आणि समुद्राच्या लहरी त्या प्रकाशात नाचू लागल्या. “गणपती बाप्पा मोरया!”चा गजर आणि लाटां वरील प्रकाशरेखा – भक्ती आणि निसर्गाचा सुरेल संगम मनाच्या खोलवर कोरला गेला.
- दुसऱ्या दिवशी सामान आवरताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि विरहाची एकत्र छाया होती.
- आईच्या मायेचा स्पर्श, आजीच्या मंद स्मितातली आपुल की आणि मुलांच्या डोळ्यांतली खेळाची चमक… जणू दहा दिवसांचा उत्सव मनात साठवून प्रत्येक जण पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाला होता.
- गाव सोडताना माझे डोळे शेवटचा कटाक्ष त्या हिरव्यागार डोंगरांकडे, फळांनी बहरलेल्या झाडांकडे आणि नारळी-पोफळीच्या बागांकडे वळले.
- प्रत्येक झाड जणू निरोप देत शांत स्मित करत होतं. पाय वाटेवर अजूनही रंगीबेरंगी रांगोळ्या आणि उत्सवाच्या आठवणी डोलत होत्या.
- प्रवास सुरू झाला तरी मन गावाच्या प्रेमाने घट्ट पकडून राहिलं. गाडीच्या खिडकीतून दिसणारे लालसर रस्ते, नद्या आणि त्यांच्या काठावर खेळणारी मुलं – निसर्गाच्या या साध्या सौंदर्याने मन जणू शांततेच्या अमृताने न्हाऊन निघालं.
- राजापूरच्या छोट्याशा हॉटेलात गरम भजी आणि कडक चहा घेताना विसर्जनातील आठवणींनी गप्पांचा वर्षाव केला.
- कोण कुठे नाचलं, कोणाच्या घरचा फराळ किती सुरस हो ता,दुर्वा फुले आणताना घडलेल्या खोड्य त्या आठवणींनी संध्याकाळ उजळून निघाली.
- संध्याकाळी समुद्रकिनारी मित्रांसोबत बसून गप्पा रंगल्या. अस्ताला जाणाऱ्या सुर्याच्या प्रकाशात आरती करताना उमटलेली भक्ती आणि लाटांवरील नाचणारे दीप अजूनही डोळ्यांसमोर आहेत.
- वाऱ्यावर डोलणाऱ्या नारळाच्या झाडांकडे पाहत आम्ही हसत खेळत विसर्जनाच्या किस्स्यांवर चर्चा करत बसलो होतो.
- समुद्राच्या खारट सुगंधाने त्या क्षणांना एक वेगळंच जादुई रूप लाभलं. वाडीत शक्ती तुऱ्याच्या सामन्यांमध्ये झाकडी नृत्याचा जोश पाहून गावाची जिद्द आणि एकजूट जाणव त असे.
- लहान मुलींच्या फुगडीच्या खेळातलं निरागस हसू आणि मुलांच्या झाकडी नृत्यातून उमटणारी ऊर्जा मन हेलावून टाकणारी होती.
- संध्याकाळ होत आली तरी मन मागे वळून पाहत राहिलं. गावाच्या निसर्गात आणि खेळांच्या आनंदात गेलेले ते दहा दिवस आयुष्याला नवा अर्थ देऊन गेले होते.
- शेवटी गाव सोडण्याची वेळ आली तेव्हा डोळ्यांत अश्रू दा टून आले. नकळत गालावरून ते ओघळले. त्या अश्रूंमध्ये विरह नव्हता, तर आपलेपणाचा गहिवर होता.
- जणू निसर्गाने प्रेमाने डोळे पुसले, समुद्राने हलकेच आलिं गन दिलं आणि वाऱ्याने कानाशी कुजबुज केली –“जिथे आठवणी आहेत, तिथेच तुझं खरं घर आहे.”
- क्षणभर डोळे मिटले आणि मनाने कुजबुजले – “हे गाव फक्त जमीन नाही… ही माझ्या आत्म्याची ओळख आहे.
- इथेच माझ्या हसण्याचा आवाज आहे, इथेच माझ्या स्वप्नां चा धागा जुळतो. कितीही दूर गेलो तरी हे गाव माझ्या मनात सदैव जिवंत राहील.”
- अश्रू ओघळले… पण त्या अश्रूंमध्ये विरहाची नाही, तर प्रेमाची भाषा होती.
- लेखन – शरद यशवंत नवाळे बुरंबेवाडी, देवाचे गोठणे, ता. राजापूर
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











